tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

छाटते निमिषात इतकी धार आहे!

 

 

छाटते निमिषात इतकी धार आहे!
जीभ नाही, तळपती तलवार आहे!!

 

प्रेत सुद्धा बोलते की, काय झाले!
चेह-यावर ओळखीचा वार आहे!!

 

केवढा नाजूक हा गुंता सुटाया....
हातही तितका तुझा अलवार आहे!

 

काय हातोहात मी गोत्यात आलो!
मी समजलो....सोबतीला यार आहे!!

 

पाठ थोपटतोस माझी योग्य वेळी....
कान पिळण्याचा तुला अधिकार आहे!

 

ही हुशारी सर्व पत्नीचीच माझ्या....
चालला झोकात जो संसार आहे!

 

शेर झंकारेल माझा अंतरंगी!
काळजाचा त्यामधे झंकार आहे!!

 

जे जसे आहे तसे स्वीकारतो मी!
मी कुठे केली कधी तक्रार आहे?

 

लखलखटाने तुझ्या कित्येकवेळा.....
नाहला अभ्यंग हा अंधार आहे!

 

तू न काही बोलता हसलीस गाली!
मी समजलो....तो तुझा होकार आहे!!

 

तो कटाक्षांचा उरी खंजीर आहे;
जखम ज्याची, आजही सुकुमार आहे!

 

प्रेत भडभडता परतले लोक सारे!
फक्त उरली राख....ती गपगार आहे!!

 

केवढा कल्लोळ आहे हा स्मृतींचा!
मन नव्हे, हा मासळी बाजार आहे!!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

HTML Comment Box is loading comments...