tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

गगन ठेंगणे जणू जाहले, हसायचो मी अशा त-हेने!

 

 

गगन ठेंगणे जणू जाहले, हसायचो मी अशा त-हेने!
वाटावे आभाळ फाटले, रडायचो मी अशा त-हेने!!

 

गुन्हा कुणीही करो, परंतू, मलाच शिक्षा दिली जायची!
गुन्हाच वाटायचा जगाला, चुकायचो मी अशा त-हेने!!

 

प्रथम पंख अन् नंतर माझे पाय छाटले गेले दोन्ही;
बिनपंखांचा! बिनपायांचा!.....फिरायचो मी अशा त-हेने!!

 

देहाने मी एक दिशेला, मन माझे दुस-याच दिशेला;
सहका-यांच्या घोळक्यांमधे असायचो मी अशा त-हेने!

 

जगणे माझे, सरणावरचे जळणे होते...कुणा न कळले!
धूर न कोठे, आग न कोठे, जळायचो मी अशा त-हेने!!

 

दोष कुणाला कशास देवू? आयुष्याने मला झुलवले!
भास वाटचालीचा व्हावा, झुलायचो मी अशा त-हेने!!

 

सशाप्रमाणे कोणी धावे, कासवापरी कोणी चाले;
जीवन जैसी शर्यत आहे, जगायचो मी अशात-हेने!

 

कुणा वाटले औषध होते! कुणा वाटले वीषच होते!
उक्ती माझी अशीच होती! भिनायचो मी अशा त-हेने!!

 

प्रकाश वाटत गेलो! नाही, भेदभाव कोठेही केला;
सूर्य ढळावा सूर्यास्ताला, ढळायचो मी अशा त-हेने!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

HTML Comment Box is loading comments...