tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

गंध उधळावा, तसे हे, प्राणही उधळून द्यावे!

 

 

गंध उधळावा, तसे हे, प्राणही उधळून द्यावे!
फूल मिटते त्याप्रमाणे शेवटी डोळे मिटावे!!

 

जीवनाच्या संगिताचा, हरघडी आस्वाद घ्यावा;
रागरंगांना क्षणांच्या ओळखावे! गुणगुणावे!

 

हा कसा मुळमूळ* रडल्यासारखा पाऊस पडतो?
पावसाने पावसाच्या पायरीने कोसळावे!

 

कुंपणे घालून परिमळ कैद करता येत नाही;
फूल द्यावे! फूल घ्यावे! अन् स्वत:ही फूल व्हावे!

 

रूप असलेल्या फुलांनी डौल ऎटीने जपावा;
गंध असलेल्या फुलांनी दिलखुशीने दरवळावे!

 

धबधब्याची झेप घेणे शक्य प्रत्येकास नाही;
आपला जो पिंड आहे, त्याप्रमाणे झुळझुळावे!

 

वेदना सोसायचाही कैफ काही और असतो;
ऊन्ह सोसावे कसे ते वाळवंटाला पुसावे!

 

घे भरारी, गैर नाही, घाल गगनाला गवसणी!
मात्र गगनासारखे तू या धरेसाठी झुकावे!!

 

जीवनाचा पोत ज्याचा तोच हातांनी ठरवतो;
वस्त्र तुमच्या जीवनाचे अन्य कोणी का विणावे?

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

HTML Comment Box is loading comments...