tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

गरीब नाही गाय मराठी!

 

 

गरीब नाही गाय मराठी!
खमकी आहे माय मराठी!!

 

वाचलास का तुक्या, ज्ञानिया?
कळेल मग की, काय मराठी!

 

का न व्हायची गझल मुलायम?
तिच्यात आहे साय मराठी!

 

मराठमोळ्या अस्सल गझला.....
ही तर आहे आय मराठी!


(आय म्हणजे मिळकत/प्राप्ती/उत्पन्न)

नकोस समजू लेचापेचा......
लटपटेल का पाय मराठी?

 

जा कुठल्याही खेडेगावी......
अन् ऐक....हायफाय मराठी!

 

ऐसे वैभव दिले तिने की,
जायचेच ना वाय मराठी!


(वाय म्हणजे वाया/व्यर्थ/निष्फळ/मिथ्या)

फुळकवणी अन् फिकी फिकी ना.....
गोड गोड ही चाय मराठी!

 

हासडलेल्या शिवीत सुद्धा.....
येईल आयमाय मराठी!

 

शब्दांना वाळीत टाकता?
अशीच वाया जाय मराठी!

 

हायहूय करणार न कोणी......
दणकट आहे हाय मराठी!

 

(हायहूय म्हणजे दु:खोद्गार/करुणोद्गार/वेदनेची विव्हळणी
हाय म्हणजे हयात/आयुष्य)

ट्विंकल ट्विंकल करती पोरे......
खाते बघ मग हाय मराठी!


(हाय खाणे म्हणजे जिवाला लावून घेणे/धास्ती वाटणे)

अनिवासी भारतीय बघुनी.....
स्फुंदते हाय हाय मराठी!


(स्फुंदणे म्हणजे मुसमुसणे/हुंदके देऊन रडणे)

मराठीतुनी शिक्षण देता.......
पतकरते ना हाय मराठी!


(हाय पतकरणे म्हणजे पश्चात्ताप करणे/दु:खोद्गार काढणे)

रक्त मराठी रडे न केव्हा......
सोडत नाही हाय मराठी!


(हाय सोडणे म्हणजे उसासा टाकणे)

चहूकडे व्यवहार मराठी......
होण्या घेते हाय मराठी!


(हाय घेणे म्हणजे ध्यास घेणे)

अंतरजालावरी मराठी!
नवीन हा अध्याय मराठी!!

 

भाषांच्या सागरात या.....
आहे गोगलगाय मराठी!
(गोगलगाय म्हणजे एक सौम्य व कष्टाळू माणूस/प्राणी...लाक्षणीक अर्थ)

 

समाज सारा साक्षर करण्या.....
एकच तरणोपाय मराठी!

 

न्यायालयही असो मराठी.....
न्यायाधीश नि न्याय मराठी!

 

असो कोणती भाषा तुमची......
करीत ना अन्याय मराठी!

 

शिका मराठी....लिहा मराठी!
करतेच ना अपाय मराठी!!

 

एकजूट सगळ्यांची करण्या.....
रामबाणच उपाय मराठी!

 

असो परिक्षा सरकारीही....
तिथे हवा पर्याय मराठी!

 

राजकारणी केंद्राचेही.....
घेतातच अभिप्राय मराठी!

 

यवनांचीही खात्री झाली......
अल्लाची ही गाय मराठी!
(अल्लाची गाय म्हणजे अत्यंत निरुपद्रवी गरीब व्यक्ती)

 

मराठीतली वृत्ते वाचा.....
समजेल.... महाकाय मराठी!

 

असो शर्ट अन् पॅंट कोणती.....
परी हवा वर टाय मराठी!

 

प्रेम मराठी बघून झाले.......
न पाहिला तू डाय मराठी!


(डाय म्हणजे द्वेष/तिरस्कार)

विनय, नम्रता प्रथा मराठी!
दिसायचा ना थाय मराठी!!


(थाय म्हणजे अहंकार)

शिष्य भटांचा भाग्यवान मी!
मला मिळाला थाय मराठी!!


(थाय म्हणजे वारसांना वाटून द्यायची रक्कम)

मोडतोड बघुनी भाषेची......
पहा फोडते धाय मराठी!


(धाय फोडणे म्हणजे टाहो/हंबरडा फोडणे/रडारड करणे)

उंच उंच शिखरांवरतीही......
पहा पोचले पाय मराठी!

 

असो कितीही खुर्ची मोठी.....
असतो तिजला पाय मराठी!

 

भाषांच्या पर्वतांस असतो.......
भरभक्कम तो पाय मराठी!


(पाय म्हणजे पायथा)

बहुभाषांच्या वटवृक्षाचे......
जमिनीमधले पाय मराठी!


(पाय म्हणजे झाडाचे मूळ)

पूर्ण पत्र इंग्रजीत होते......
तळटीपेचे पाय मराठी!


(पाय म्हणजे पत्राचा खालचा भाग)

चढून गेले उंच पदावर.....
अशा शिडीचे पाय मराठी!


(पाय म्हणजे शिडीची पायरी)

कुठल्याही हमरस्त्यावरती.....
ठायीठायी पाय मराठी!
(पाय म्हणजे पाऊलखुणा/चिन्ह/लक्षण)

 

संधी येते जेव्हा जेव्हा......
पहा उचलते पाय मराठी!
(पाय उचलणे म्हणजे भरभर चालणे)

 

मदत कुणा करण्याच्या वेळी.......
काढत नाही पाय मराठी!
(पाय काढणे म्हणजे निसटणे/निघून जाणे)

 

असो कितीही खडतर रस्ता......
कापत नाही पाय मराठी!
(पाय कापणे म्हणजे घाबरणे/भिणे)

 

कडाक्यात भाषावादांच्या........
खुडून घेते पाय मराठी!
(पाय खुडणे म्हणजे निजताना पाय अंगाशी घेणे)

 

जातानाही प्राण जिवाचे.......
खोडत नाही पाय मराठी!
(पाय खोडणे म्हणजे मरताना पाय झाडणे)

 

नव्या नव्या क्षेत्रात जायला......
सदैव घेते पाय मराठी!
(पाय घेणे म्हणजे प्रवृत्ती/इच्छा होणे एखादे काम करण्याची)

 

भले कुणाचे होते तेव्हा.....
तोडत नाही पाय मराठी!
(पाय तोडणे म्हणजे कामात विघ्न आणणे)

 

साधनेविना सिद्धी नाही........
दावत नाही पाय मराठी!
(पाय दावणे/दाखवणे म्हणजे दर्शन देणे)

 

असो स्वप्न ते कोणाचेही........
कधी न देते पाय मराठी!
(पाय देणे म्हणजे पायाखाली तुडविणे)

 

असो कुठेही दिव्य माणसे......
लगेच धरते पाय मराठी!
(पाय धरणे म्हणजे पाया पडणे)

 

भाषांच्या या विवादांमधे......
फुकून टाके पाय मराठी!
(फुकून पाय टाकणे म्हणजे काळजीने/सावधगिरीने वागणे)

 

कधी भेटता देवमाणसे.......
धुते ईश्वरी पाय मराठी!
(पाय धुणे म्हणजे आदरार्थी पूजनीय पाय धुणे)

 

लाभण्यास अभिजातपणा तो.......
ठरतच नाही पाय मराठी!
(पाय न ठरणे म्हणजे सारखे भटकत राहणे)

 

परभाषांचे शब्द झेलण्या......
निघती सदैव पाय मराठी!
(पाय निघणे म्हणजे बाहेर जाणे/मोकळे होणे)

 

तशी लाजरी बुजरी आहे.......
कुठे पसरते पाय मराठी?
(पाय पसरणे म्हणजे अधिकार प्रस्थापित करणे/चंचूप्रवेश मिळता पूर्ण प्रवेश करणे)

 

घोर तिला ना अस्तित्वाचा......
पसरुन निजते पाय मराठी!
(पाय पसरून निजणे म्हणजे निश्चिंतपणे निजणे)

 

कधीच कुठल्या वादाला ती......
फोडत नाही पाय मराठी!
(पाय फोडणे म्हणजे विषयांतर करणे/ फाटे फोडणे)

 

व्रत भाषेचे निभावताना......
भुईस लागे पाय मराठी!
(भुईस पाय लागणे/लावणे म्हणजे कामास कायमता येणे)

 

घरकोंबडी न केव्हा होते.......
करी मोकळे पाय मराठी!
(पाय मोकळे करणे म्हणजे घराबाहेर मोकळ्यावर फिरायला जाणे, घरकोंबडी म्हणजे घरबशी किंवा एकलकोंडी)

 

कुणाच्याच वाटेत कधीही......
मोडत नाही पाय मराठी!
(पाय मोडणे म्हणजे धीर खचवणे/मोडता घालणे)

 

अंतरजालावरी अताशा.....
पहा रोवते पाय मराठी!
(पाय रोवणे म्हणजे स्थिर/कायम होणे)

 

जिथे कुठे भाषांचा उत्सव.......
तिथे वाहती पाय मराठी!
(पाय वाहणे म्हणजे एखाद्या ठिकाणी जाण्याची अनिवार इच्छा निर्माण होणे)

 

परदेशी विद्यार्थी सुद्धा......
शिवती माझे पाय मराठी!
(पाय शिवणे म्हणजे पायांना स्पर्श करणे)

 

सिंहासनही हवे मराठी.....
जिथे असावा राय मराठी!
(राय म्हणजे राजा)

 

कधी कधी स्पर्धेत अशी ही.....
चालते लाय लाय मराठी!
(लाय लाय उष्णतेने वा स्पर्धेने धापा देणे)

 

जेव्हा हतबल होते बुद्धी......
जिवा पाहिजे साय मराठी!
(साय म्हणजे सावली/आसरा)

 

जातानाही ‘येते’ म्हणते......
कधी न म्हणते ‘बाय’ मराठी!

 

गाथा घ्या वा, दासबोध घ्या......
दिसेल तुम्हा साय मराठी!
(साय म्हणजे सार/सत्वांश/सारांश/तात्पर्य)

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

 

HTML Comment Box is loading comments...