tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

हाय आले जीवनाचे भान मरताना!

 

हाय आले जीवनाचे भान मरताना!
श्वास घेण्याचेच केले काम जगताना!!

 

काय केले, काय नाही, पाहिले नाही;
आंधळे आयुष्य जगलो अंध नसताना!

 

राख होताना कुणीही बोलले नाही;
का दिशा करतात चर्चा आग विझताना?

 

ना विनासायास आली ही अनासक्ती;
आतड्यांना पीळ पडले पाश तुटताना!

 

लाख डवरू दे फुलांनी झाड बहरू दे;
वेदना होतेच त्याला पान गळताना!

 

घोट एकाकीपणाचे प्यायला शिकलो;
पाहिले परसात जेव्हा झाड वठताना!

 

हा प्रपंचाचा पसारा चार दिवसांचा!
रोज ही जाणीव होते सूर्य बुडताना!!

 

वंचना याहून मोठी कोणती असते?
पारखे आकाश व्हावे पंख असताना!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

HTML Comment Box is loading comments...