tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

मंद, कोणाला जलद तो वाटतो!

 

 

मंद, कोणाला जलद तो वाटतो!
काळ काळाच्या गतीने चालतो!!

 

जायचे, ना जायचे ते, तू ठरव.....
काळ कोणास्तव कधी का थांबतो?

 

कात, तंबाखू, सुपारी, अन् चुना....
सर्व असले की, विडा मग रंगतो!

 

कैफ गझलेचा अहोरात्री असा.....
वाटते दारू पितो अन् झिंगतो!

 

का न ओठांवर गझल या यायची?
मी अरे, गझलेमधे तर डुंबतो!

 

पाहतो जेथे कुठे दिव्यत्व मी.....
जोडुनी मी हात त्याला वंदतो!

 

फक्त आहे दर्शनी मी शांतसा.....
आत माझ्याशीच मी तर झुंजतो!

 

लोक नादातच फुलांच्या धावती....
मात्र मी काटेच वेचत थांबतो!

 

कोंडवाडे वाटती डोळेच हे!
रोज अश्रूंची गुरे मी डांबतो!!

 

मी कुठे प्यालो अरे दारू कधी?
का मला येतो नि जो तो हुंगतो?

 

हे तुला कळणारही नाही कधी......
मी मनातच माझिया आक्रंदतो!

 

जिंदगी! आहे खिलाडू एक मी!
हार होवो, जीत होवो....खेळतो!!

 

तू उधळ नियती भलेही कैकदा....
मी नव्याने डाव माझा मांडतो!

 

शायरी इतकी शिगोशिग अंतरी....
की, जिथे जातो तिथे ती सांडतो!

 

हो! भिडस्तासारखा आहेच मी!
ना म्हणायाला सतत संकोचतो!!

 

तो गझल लिहिण्यास देतो प्रेरणा.....
जो अनाहत नाद हृदयी गुंजतो!

 

राग कोणावर कसा राहील रे?
रोज मी माझे हृदय खंगाळतो!

 

कोण वाचवणार त्याला या पुढे?
हात मदतीचाच तो झिडकारतो!

 

गप्प झाले सर्व मी आल्यावरी;
आज जो तो कान का टवकारतो?

 

सांत्वनांची और ही आहे त-हा.....
तो दिलासेही पहा भिरकावतो!

 

कोण रे वाटेस त्याच्या जायचा?
जेथल्या तेथेच तो ठणकावतो!

 

मी कितीही लक्षपूर्वक वागलो.....
कोण जाणे मी कसा चुरगाळतो!

 

रोज कोणी ना कुणी मज छेडते.....
रोज एखादी गझल झंकारतो!

 

तूच आता सोबतीला, हे बरे!
अन्यथा रस्ता किती धमकावतो!!

 

थांब थोडेसेच मृत्यू पळभरी!
जिंदगी माझी जरा गुंडाळतो!!

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

 

HTML Comment Box is loading comments...