tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

नशेत होतो, कुशीमधे घेउनी उशी मी निजलो होतो!

 

 

नशेत होतो, कुशीमधे घेउनी उशी मी निजलो होतो!
नाव तुझे कोरून तरूवर, त्यास बिलगुनी रडलो होतो!!

 

असे वाटले, अंधाराच्या खाईतच कोसळलो होतो.....
जिथे स्वत:च्या ठिक-या ठिक-या चाचपडत मी बसलो होतो!

 

एकजात सा-या स्वप्नांचा चकनाचूरच झाला होता.....
ज्याच्यामध्ये सडा भुग्याचा बनून मीही पडलो होतो!

 

काळोखाला कुठे समजते, रंग कोणता समोर आहे?
लालबुंद रक्तात नाहलो, तरी कुठे मी दिसलो होतो?

 

शक्यच नव्हते किरणशलाका वा एखादी झुळूक येणे.....
इतक्या मी खोल खोल गर्तेमधेच पुरता बुडलो होतो!

 

ठिकरी ठिकरी गातच बसली आयुष्याची जणू भैरवी.....
बिनसरणाचा, बिनअग्नीचा मीही धुमसत बसलो होतो!

 

इतक्या सुंदर आरंभाचा अंत केवढा करूण व्हावा!
नियतीच्या क्रौर्याचा नमुना मी जातीने बनलो होतो!!

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

 

HTML Comment Box is loading comments...