tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

जुनी आठवण डोळ्यांतून ओघळते आहे

 

 

जुनी आठवण डोळ्यांतून ओघळते आहे,
कमतरता त्यांची पुन्हा जाणवते आहे !!
बहरून आले रान फुलांचे मनात ओल्या,
अवतीभवती तीच जणू वावरते आहे !!
नसतांना ती समीप असते खूप मनाच्या,
त्यांचे नसणे हाय! मला आवडते आहे !!
खचते आहे भिंत मनाची तिच्या कारणे,
तोल मनाचे तीच पुन्हा सावरते आहे !!
चिंब पाकळया बकुळफुलांच्या गंध सोडती,
श्वासांसोबत आस पुन्हा वादळते आहे !!
पुन्हा दाटले मेघ व्यथांचे कातरवेळी,
डोळ्यांमधली याद पुन्हा कोसळते आहे !!
कोसळती उल्का मनावर रोज व्यथांच्या,
तटबंदी माझी पुन्हा ढासळते आहे !!
रात दाटता उगवून येते स्वप्न गुलाबी,
सकाळ होता हाय! पुन्हा मावळते आहे !!
रुक्ष कोरडे डांबररस्ते गावामधले,
वनात सृष्टी पायघड्या अंथरते आहे !!
छातीवरती रोज नाचती शब्द "शिवा " चे,
गझल दुधारी प्राण जणू खुंदळते आहे !!

 


-शिवाजी घुगे.

 

 

HTML Comment Box is loading comments...