tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

अंगाखांद्यावरी मनाच्या बागडती स्मरणांच्या लाटा!

 

 

 

अंगाखांद्यावरी मनाच्या बागडती स्मरणांच्या लाटा!
अन् हृदयाच्या पुळणीवरती पुन्हा उमटल्या नवीन वाटा!

 

पुन्हा पसरला सुखद क्षणांच्या वाळूचा गालिचा मनोहर;
पुन्हा एकदा अंगावरती, सरकन आला गुलाब काटा!

 

अवघड नाही आयुष्याला रूप, रंग लाभणे खरोखर;
फक्त तुझा कुंचला फिरू दे, अन् उमटू दे एक फराटा!

 

कट्ट्यावरती बसून इतक्या नकोस गाऊ गझला माझ्या;
हळूहळू हा कट्टा म्हणजे दु:खांचा होईल चव्हाटा!

 

वाट्याला आसवेच आली; तरी हिंदळू* दिले न डोळे;
त्या अश्रूंचे मोती झाले! मला मिळाला माझा वाटा!

 

आड कधी व्यवहार न आला, जगलो अगदी ऎसपैस मी;
वाटत सुटलो प्रेम जगाला, नफा कशाचा, कसला घाटा?

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

HTML Comment Box is loading comments...