tarasingh
Administrator Dr. Srimati Tara Singh

तू माझ्या आयुष्यामधला सुवर्णपिंपळ!

 

 

 

तू माझ्या आयुष्यामधला सुवर्णपिंपळ!
तुझ्याच पानांची हृदयी या आहे सळसळ!!

 

डोळ्यांमधले जरी संपले, रडून अश्रू......
जुन्या आसवांचे गालावर, अजून ओघळ!

 

रोज पाठमोरे मजला आरसा निरखतो.....
पाठीवरले बहुधा तो मोजत बसतो वळ!

 

वहात होता रस्ता....मी बाजूला होतो!
रस्त्यावरला मी मैलाचा होतो कातळ!!

 

अहोरात्र मज साद घालतो नाद अनाहत!
श्वासांमध्ये एक अलौकिक येतो दरवळ!!

 

दिसायला सामसूम दिसते रोजच रात्री....
मनात माझ्या, मात्र स्मृतींची असते वर्दळ!

 

हत्येची चर्चा दुनियेची चार दिसांची!
नंतर नसते खंत, कुठेही नसते हळहळ!!

 

देतो एखादाच आहुती अशी जिवाची!
अशा नरेंद्राची मग कळते जगास चळवळ!!

 

म्हणून नाही रंग मला, आकार स्वत:चा!
जगणे माझे नितळ, शुद्ध, झुळझुळणारे जळ!!

 

हाल मनाचे तुझ्या समजती डोळ्यांमधुनी!
स्पष्ट दिसे ओघळलेले डोळ्यांचे काजळ!!

 

दिसायला वरुनी दिसतो पालापाचोळा!
उरात माझ्या एक कोंडले आहे वादळ!!

 

ऐसपैस मी जगतो अन् उधळतो स्वत:ला....
परी बोलणे माझे नसते केव्हा भोंगळ!

 

काहीजण नाइलाज म्हणुनी जगती येथे!
मरण येत नाही हे कारण असते केवळ!!

 

दिसो कितीही संथ, नदी ही वहात असते!
शांत जळाच्या तळामधेही असते खळबळ!!

 

मनापासुनी आटवतो मी रक्तच माझे!
त्रागा नसतो, शिकवण्यामधे असते कळकळ!!

 

गरजा केल्या कमी, रहाणी साधी केली!
निवृत्तीने बंदच केले खर्च वायफळ!!

 

मास्तरकीने मला शिकवले बोलायाला!
सतत बोलणे माझ्या डाव्या हाताचा मळ!!

 

कधी कधी निष्पाप दगाही मजला मिळतो!
असा दगा देणारा असतो भलता सोज्वळ!!

 

उगव तरी सूर्या तू मजला, अन् दे दर्शन!
अर्घ्य द्यायला वाट पाहते माझी ओंजळ!!

 

निवडणुका आल्या की, नेते करती भाषण!
किती घोषणा, किती वल्गना सा-या पोकळ!!

 

मराठीतही सशक्त गझला लिहिता येती!
अशा कवींची संख्या वाढो...माझी तळमळ!!

 

दाद पांडुरंगाला द्या, या गझलेबद्दल!
खयाल त्याचे, मी तर आहे निमित्त निव्वळ!!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

 

HTML Comment Box is loading comments...