www.swargvibha.in






 

 

कवितासागर दिवाळी अंकाला पुरस्कार

 

diwalialanka

 

साप्ताहिक उल्हास प्रभात, ठाणे आणि आरोग्य होमिओपॅथीक फार्मसी यांच्यातर्फे राज्यस्तरीय दिवाळी अंक 2013 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या मध्ये महाराष्ट्रातील शेकडो दिवाळी अंकांनी आपला सहभाग नोंदवला होता. मराठी माणसाच्या दिवाळीचा जणू अविभाज्य भाग झालेल्या दिवाळी अंकांच्या शतकोत्तर परंपरेचे औचित्य साधून यंदाच्या उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार देण्यासाठी आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या "कवितासागर" दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले आहे.

 

ठाणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात "कवितासागर" नियतकालिकाचे उपसंपादक व कवी प्रकाश केसरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या ई टि व्ही वरील मालिकेची अभिनेत्री धनश्री काडगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्या म्हणाल्या, वाचन संस्कृती लोप पावत आहे असे न म्हणता सर्वांनी वाचन संस्कृतीच्या वाढीस प्रयत्न करूया. मला देखील दिवाळी अंक वाचायला खूप आवडतात. ‘गंध फुलांचा गेला सांगून’ मधील महिमाची भूमिका करण्या अगोदर तिच्या आयुष्या संबंधित बरीच पुस्तके वाचावी लागली, तसेच सर्वांनी वाचनाकडे वळावे यासाठी मी प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि दिवाळी अंकांची सुरू असलेली 105 वर्षांची परंपरा यापुढेही कायम राहावी, तसेच वाचकांना यापुढेही दर्जेदार दिवाळी अंक वाचायला मिळावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने उल्हास प्रभातचे संपादक गुरुनाथ बनोटे यांनी सांगितले.

 

उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ कवितासागर यांच्या वतीने प्रकाशित एक आगळा वेगळा व कौतुकास पात्र ठरलेला, अनेक नवकवींच्या कवितांना सर्वप्रथम स्थान देणारा व फक्त केवळ कवितांसाठी असलेला एकमेव दिवाळी अंक "कवितासागर" गेल्या वर्षी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. कवितासागर दिवाळी अंक जगभरात कुठेही फक्त एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाचा नवा मार्ग स्वीकारणा-या नव्या दमाच्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरला होता. या वर्षीचा अंक सर्वदूर पोहचविण्यासाठी संपादक मंडळाने चांगले प्रयत्न केले आहेत. 01 नोव्हेंबर 2013 रोजी दिवाळी अंक प्रसिद्ध होवून सर्वत्र वितरीत केला गेला. कवितासागर सर्व लेखक कवी यांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत कवितासागर प्रकाशनाने अनेक लेखक कवी यांचे साहित्य प्रसिध्द केले आहे, आणि नुसतेच प्रसिद्ध केले नाही तर हे सर्व लिखाण जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचवले आहे, यावर्षीचा दिवाळी अंक जगभरातील ई-दिवाळी अंकांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये आहे. कवितासागर मधील सर्वच साहित्य वाचनीय, हृदयस्पर्शी आहे. नवीन लेखक, कवी प्रकाशात यावेत म्हणून नवोदितांना 'एक चांगले व्यासपीठ' निर्माण झाले आहे. या सर्व साहित्याचा आस्वाद घेऊ इच्छिणा-या रसिक वाचकांना इंटरनेटवरील दिवाळी अंक उपयुक्त ठरणारा आहे. कवितासागर दिवाळी अंक इंटरनेट बरोबरचं आयपॅड व स्मार्ट फोनवरही उपलब्ध आहे.

 

बाळ बाबर, डी. बी. चिपरगे, डॉ. कुमार पाटील, डॉ. उमेश कळेकर, अनिल पाटील, त्रिवेणी हरोले, सौ माधुरी काजवे, सौ. स्वप्नजा घाटगे, किरण पाटील, विजय बेळंके, दिशा शिंदे, अनिल धुदाट, प्रकाश केसरकर, डॉ. विजयकुमार माने, शांतीनाथ पाटील, जयंत पठाडे, प्रा. दिवाकर बोबडे, मयुर ढोलम, सदाशिव कुंभार, उज्ज्वला माघाडे, मयुरी नाईक, डॉ. नंदकुमार नहार, पूजा डकरे, रमेश इंगवले, सुहास समडोळे, शफी बोल्डेकर, अशोक पाटील, विष्णू वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कवितांनी या अंकाची उंची वाढवली आहे. वाचन संस्कृती लयाला जात चालली आहे, असे कितीही म्हटले तरी ते चुकीचे आहे. अन्यथा दरवर्षी दिवाळी अंकांची भर पडली नसती. दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असे मत साहित्यिक अनिल धुदाट (पाटील) यांनी व्यक्त केले.

 

नवसाक्षर व खेडोपाडयातील वाचन करणारे अनेक वाचक मला भेटतात. त्यामुळे वाचनसंस्कृती लयाला गेलेली नाही. दिवाळी अंकाने ते स्थान राखून ठेवले आहे, असे "कवितासागर" चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांनी सांगितले

कवितासागर प्रकाशन गेल्या अनेक वर्षांपासून "कवितासागर"या दिवाळी अंकाची सातत्याने निर्मिती करीत आहे. गतवर्षी कवितासागरच्या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. त्याच बरोबर या पूर्वीही सर्वोकृष्ट दिवाळी अंक म्हणून कवितासागरला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ठाणे येथील हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, “कवितासागर” दिवाळी अंकाच्या अतिथी संपादिका - सौ. विजया प्रकाश पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर कार्यक्रमास उल्हास प्रभात संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ बनोटे, अभिनेत्री धनश्री काडगांवकर, कुळगाव - बदलापूर नगरपरिषेदेच्या नगराध्यक्षा - सौ. स्नेहा पातकर, उप नगराध्यक्ष - आशिष दामले इत्यादी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातून विविध भागातील दिवाळी अंकाचे संपादक - प्रकाशक - लेखक व कवी मोठया संख्येने हजर होते.

 

HTML Comment Box is loading comments...